मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | “निलंबित मोटार वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी माझ्याविरुद्ध तसेच परिवहन आयुक्त व इतर पाच अधिकाऱ्यांविरोधात नाशिक येथील पंचवटी पोलीस स्टेशन मध्ये दिलेली तक्रार ही पूर्णतः निराधार व खोटी आहे” असं राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटलं आहे. “विभागातील अनेक तक्रारींच्या पार्श्वभूमीवर निलंबित झालेल्या अधिकाऱ्याने सूडबुद्धीने खोटे आरोप करून माझी व महाविकास आघाडी सरकारची बदनामी करण्याचे षडयंत्र आखले आहे” असा आरोप अनिल परब यांनी केला आहे.
“मंत्र्यांवर आरोप करून राज्य सरकार या मंत्र्यांचे काहीही वाकडे करू शकत नाही असे भासवून, उच्च न्यायालयामार्फत CBI चौकशीची मागणी करणे आणि सरकार व मंत्र्यांची प्रतिमा मालिन करणे, या राजकीय हेतूने केलेली ही तक्रार आहे” असे अनिल परब यांचे म्हणणे आहे. या तक्रारीची नाशिक पोलीस चौकशी करीत असून, चौकशीअंती सत्य जनतेसमोर नक्कीच येईल, असा दावा अनिल परब यांनी केला आहे.
गजेंद्र पाटील यांनी १६ मे रोजी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. गजेंद्र पाटील हे नाशिक येथे मोटार वाहन निरिक्षक होते. पोलीस आयुक्त दीपक पांडये यांनी आता या तक्रारीची दखल घेत, सखोल चौकशी करण्याचे आदेश गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तांना दिले आहेत. उपपरिवहन अधिकारी बजरंग खरमाटे हे परिवहन विभागाच्या राज्यभरातील बदल्या मॅनेज करतात, त्यासाठी कसे अर्थपूर्ण व्यवहार चालतात, त्याची माहिती तक्रारीत देण्यात आली आहे. परिवहन मंत्री अनिल परब हे बजरंग खरमाटेना संरक्षण देतात, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या आरोपाविरोधात अनिल परब यांनी आपली भूमिका मांडत आरोपाला फोल ठरवले आहे.