राजमुद्रा वृत्तसेवा |पंजाब नॅशनल बँकेला मोठा गंडा घालून परदेशात फरार झालेल्या हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचे कोठडीतील खळबळजनक फोटो समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी मेहुल चोक्सीने अँटिग्वातून पोबारा केल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर त्याचा शोध सुरू करण्यात आला होता. डोमिनिकामध्ये चोक्सीला अटक करण्यात आली. तेव्हापासून चोक्सी पोलीस कोठडीत असून, कोठडीतील त्याचे काही फोटोही समोर आले आहेत. यात त्याचा एक डोळा लाल झालेला दिसत असून, हातावरही मोठे काळे व्रण दिसत आहेत.
पंजाब नॅशनल बँकेला मोठा गंडा घालून मेहुल चोक्सी भारतातून फरार झाला होता. त्याला परत आणण्यासाठी भारताकडून प्रयत्न सुरू असतानाच त्याने बार्बुडानंतर २३ मे रोजी अँटिग्वातून पोबारा केला होता. अँटिग्वातून फरार झालेल्या चोक्सीचा ठिकाणा डोमिनिकामध्ये लागला. स्थानिक सीआयडीने त्याला ताब्यात घेतलं होतं.
चोक्सीला अटक केल्यानंतर त्याचे वकील विजय अग्रवाल यांनी डोमिनिकामधील न्यायालयात धाव घेतली होती. हेबियस कॉर्पर्स याचिका दाखल करत अग्रवाल यांनी मेहुल चोक्सीचा छळ करण्यात आल्याचा आरोप केला होता. त्याच्या शरीरावर जखमा असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर पहिल्यांदाच चोक्सीचे तुरूंगाताली फोटो समोर आले असून, त्याच्या शरीरावर जखमा दिसत आहेत. समोर आलेल्या फोटोंमध्ये चोक्सी आजारी असल्यासारखा दिसत आहे. त्याचा एक डोळा लाल झालेला असून, हातावरही काळेनिळे डाग दिसत आहे.
“डोमिनिकामध्ये फक्त दोन मिनिटांसाठी मेहुल चोक्सीला भेटण्याची परवानगी देण्यात आली. यावेळी त्याने आपला भयानक अनुभव सांगितला. अँटिग्वा येथील जॉली हार्बर येथून आपलं अपहरण करुन डोमिनिका येथे नेण्यात आल्याचं त्याने सांगितलं. अनेक लोक यावेळी उपस्थित होते,” अशी माहिती विजय अग्रवाल यांनी चोक्सीच्या भेटीनंतर एएनआयला दिली होती.